लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील चिखली रोडलगत भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना २० जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान घडली. यामध्ये २ लाख ४१ हजार रुपयांचा माल लंपास झाला आहे. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळविहीर येथील हाजी मलंग दर्गासमोर शिक्षक विकास पांडुरंग बाहेकर (वय ४८) यांचे घर आहे. ते २० जून रोजी सकाळी ११ वाजता मित्राच्या मुलीचा साखरपुडा असल्याने घर बंद करून बाहेर गेले होते. दरम्यान, घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा समोरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात असलेल्या सोन्याच्या ४० ग्रॅमच्या दोन बांगड्या, इतर सोन्या, चांदीचे दागीने, रोख ५५ हजार रुपये असा एकूण २ लाख ४१ हजार रुपयांचा माल लंपास केला. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजता विकास बाहेकर यांचा मुलगा घरी आला असता, घरात चोरी झाल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला. प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चोरीच्या घटनेमुळे भीतीरात्रीच्या वेळी शहरात अनेक वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील काही घटनांचा तपास लागला, तर काही चोरटे आजही बाहेरच फिरत आहेत. परंतू वर्दळीच्या ठिकाणी आणि ऐन दुपारच्या वेळी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनीही आता दिवसाची गस्त वाढविणे गरजेचे झाले आहे.