येथील शेतकरी रमेश दौलत नादरकर यांची धाड शिवारात शेती आहे. त्यांच्या गट क्रमांक २९७ मधील शेतात त्यांनी साधारण दीड एकर मका लागवड केली होती. रब्बी हंगामातील मका सध्या सोंगणीकरीता आलेला आहे. या पिकावरुन इलेक्ट्रीकचे उच्च दाबाचे तार गेलेले आहेत. तर त्या खालून दुसरी विद्युत वाहिनीसुद्धा गेली आहे. ३० मार्च रोजी या दोन्ही तारांना संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या गार्डींग तार तुटुन तारांची विद्युत घर्षणाने ठिणग्या निर्माण झाल्या. यामुळे सोंगणीकरीता तयार असलेल्या मका पिकाला आग लागली आणि थाेड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण करून शेतकऱ्याचे दीड एकर मका पीक जळून खाक झाले आहे.
याप्रकरणी तलाठी प्रभाकर गवळी, कोतवाल बापू तोटे, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता निंबाळकर यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. या आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.