लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : मेहकरहून बुलडाणाकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस चिखली शहरात दाखल होत असताना ऐन उतारावर बे्रक फेल झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये घुसली. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले; मात्र वाहन चालकाच्या सुमयसूचकतेमुळे मोठी जीवितहानी टळली आहे.मेहकर आगाराची एमएच ४० एन ९९६८ या क्रमांकाची बस बुलडाणाकडे प्रवासी घेऊन निघाली होती. दरम्यान, ही बस चिखली शहरात प्रवेश करताना खंडाळा रोडवरील मोठ्या उतारावर या बसचे बे्रक फेल झाले. त्यामुळे वाहनचालकाने मोठ्या परिश्रमाने बसवर नियंत्रण मिळवित रस्त्यावरील इतर वाहने व पादचाऱ्यांना वाचवित बसला. रस्त्याच्या कडेला थांबविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान ही बस हॉटेल देव्हडे रेसिडेन्सीच्या बोर्डला धडकल्याने पुढील अनर्थ टळला व चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी हानी टळली. दरम्यान, बसचालकाने दाखविलेल्या या समयसूचकतेची तातडीने दखल घेत देव्हडे परिवाराने नुकसानीची तमा न बाळगता चालकाचा यथोचित सत्कार केला. दरम्यान, यबाबत माहिती मिळताच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
चालकाच्या समयसूचकतेने बसचा अपघात टळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:11 AM