हनुमान जगताप/सदानंद सिरसाट
मलकापूर/खामगाव (जि. बुलढाणा) : अमरनाथहून हिंगोलीला जाणाऱ्या खासगी बसला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या खासगी बसने चिरत पुढे नेले. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले असून, २४ जण गंभीर जखमी झाले. पाच जण अत्यवस्थ असून त्यांना बुलढाणा येथे हलविले आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मीनगरातील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे हा अपघात झाला. बालाजी तीर्थयात्रा कंपनी टूर ॲण्ड ट्रॅव्हल्सची बस ४० यात्रेकरूंना घेऊन परतत होती.
प्रवासी म्हणतात, चालकाने केले होते मद्यपाननागपूरकडून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाने मद्यपान केल्याची प्रवाशांची ओरड होती. अमरावतीपासून २० किमी पुढे आल्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बस जेवणासाठी थांबली होती. तेथे बसच्या चालकाने मद्यपान केले. त्यामुळे काही प्रवाशांनी कार्यालयात फोन करून चालक दुसरा ठेवण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले.
पाच लाखांची मदतमृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून पाच लाखांच्या मदतीचे निर्देश सरकारने दिले. जखमींवर शासकीय खर्चाने उपचाराच्या सूचनाही देण्यात आल्या.
मृतांत चालक-मालकहीमृतांमध्ये बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक शिवाजी जगताप, चालक संतोष जगताप, आचारी अर्चना घुकसे, सचिन महाडे, तर प्रवासी राधाबाई गाढे व कान्होपात्रा टेकाळे, यांचा समावेश आहे.