बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ बुलडाणा आगारातून विविध शहरांसाठी मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या असल्या, तरी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे़
काेराेना संक्रमण वाढल्यानंतर बसफेऱ्या बंद करण्यात आल्या हाेत्या़ गतवर्षीपासून अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने एसटी महामंडळाला माेठा फटका बसला आहे़ जून महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ त्याअंतर्गत अनेक शहरांमध्ये बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अजूनही बस सुरू करण्यात आल्या नाहीत़़ काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ मात्र, बस सुरू करण्यात आलेल्या नाहीत़
शहरांमध्ये झाल्या सुरू, ग्रामीणमध्ये प्रतीक्षा
अन्वा, अजिंठा, चांडाेळ येथे मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत़ तसेच औरंगाबाद येथे २, नागपूर येथे ३ मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत़ लातूर, पंढरपूर, धुळे, सुरत, परतवाडा, अमरावती, यवतमाळ येथेही मुक्कामी बस सुरू करण्यात आल्या आहेत़ मात्र, लिहा, धामणगाव बढे, कुऱ्हा, उबालखेड, माटरगाव येथील मुक्कामी बसफेरी अजूनही सुरू करण्यात आलेली नाही़ या गावातील प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे़ आगारप्रमुखांनी या भागात मुक्कामी बसफेरी सुरू करण्याची गरज आहे़
४० टक्के बसेस आगारातच
काेराेनाचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला आहे़ गतवर्षीपासून अनेक बसफेऱ्या बंद झाल्याने महामंडळाचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे़
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एसटीचे प्रवासी माेठ्या संख्येने घटले आहेत़
आता एसटीची वाहतूक सुरळीत झाली असली, तरी रस्त्यावर केवळ ६० टक्के बसेसच धावत आहेत़ तसेच ४० टक्के बसेस अजूनही बुलडाणा आगारातच असल्याचे चित्र आहे़
काेट
काेराेना संक्रमण वाढल्याने प्रवाशांची संख्या घटली़ प्रवाशांचा प्रतिसाद पाहून एसटी बस सुरू करण्यात येत आहे़ शाळा बंद असल्याने तसेच शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी गावातच राहत आहेत़ काेराेना निर्बंध अजूनही कायम असल्याने ग्रामीण भागातून प्रवाशांचा अजूनही पाहिजे तसा प्रतिसाद नाही़ प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्या सुरू करण्यात येत आहेत़
दीपक साळवे, सहायक वाहतूक निरीक्षक, बुलडाणा
रुग्ण घटले, ग्रामीण भागात एसटी कधी धावणार
गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात घटले आहेत़ काेराेनामुक्त गावांमध्ये शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे बुलडाणा आगारातून सुटणारी लिहा ही मुक्कामी बस सुरू करण्याची गरज आहे़
अजित माेदे, प्रवासी
काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनलाॅक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ अनेक शहरांमध्ये मुक्कामी बस सुरू झाल्या आहेत़ मात्र, ग्रामीण भागात अजूनही बसची प्रतीक्षा आहे़ ग्रामीण भागातही बस सुरू करण्याची गरज आहे़
राजू बढे, धामणगाव बढे