सिंदखेडराजा :समृद्धी महामार्गावर पिंपळखुटा गावाजवळ खासगी बस अपघातानंतर तब्बल एक तास जळत हाेती. अपघातानंतर माेठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेवून मदत केली. जवळपास एक तास ही बस जळत हाेती. त्यानंतर मेहकर, सिंदखेड राजा, लाेणार येथील अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळावर दाखल झाले. आग विझवण्यात येईपर्यंत बस जळून खाक झाली हाेती. तसेच प्रवाशांचाही काेळसा झाला हाेता.
विदर्भ ट्रॅव्हल्सची एमएच २९ बीई-१८१९ क्रमांकाची ही बस नागपूर वरुन पुण्याकडे जात होती. ३० जून रोजी नागपुर वरून सायंकाळी ५ वाजता पुण्यासाठी ही बस निघाली होती. १ जुलै च्या रात्री १.२२ मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली.त्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होऊन ही बसला आग लागली. पिंपळ खुटा येथील रामेश्वर जायभाये, शिवाजी दराडे विकास घुगे यांनी सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला फोन केला. त्यानंतर काही वेळातच घटनास्थळावर पोलीस आले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. फायर ब्रिगेडच्या वाहनाने ट्रॅव्हल्सला विझवण्यात आले. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यु झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर संदीप मेहेत्रे, यासीन शेख, बुद्ध चाैधरी आदींसह इतर ग्रामस्थांनी मदत केली.