सोहम घाडगे। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेली सैलानी बाबा यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यासह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. विदर्भ, मराठवाडा, खांदेशसह राज्यातील विविध विभागातून यात्रेसाठी अडीचशेवर विशेष बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. कायम तोट्यात चाललेल्या एसटीसाठी हा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरणार आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात दरवर्षी भव्य यात्रा भरते. राज्य व देशभरातील लाखो सर्वधर्मिय भाविक दर्शनासाठी दाखल होतात. यंदा २६ फेब्रुवारी ते १0 मार्चदरम्यान ही यात्रा भरणार आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. सैलानी बाबा यात्रेसाठी देशभरातून येणार्या भाविकांची संख्या पाहता राज्य परिवहन महामंडळाने विशेष बसगाड्यांचे नियोजन केले आहे. राज्यातील विविध आगारातून यात्रेसाठी बसेस सोडल्या जातील.
अशी राहील महामंडळाची बससेवाबुलडाणा विभाग १५0, औरंगाबाद ६0, अकोला ६0, यवतमाळ ४0, जालना ६0, अमरावती ४0 यासह अनुमतीप्राप्त अंदाजे १00 खासगी बसेस यात्रेसाठी दररोज ये-जा करतील. तसेच मराठवाड्यातील परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड विभागामधूनही दरवर्षी या यात्रेसाठी विशेष बसगाड्या पाठविल्या जातात.
तीन बसस्थानकांची सोयसैलानी यात्रेसाठी अहोरात्र वाहतूक सुरु असते. वेगवेगळ्या मार्गाने येणार्या बसेससाठी परिवहन विभागाकडून तीन बसस्थानकांची व्यवस्था करण्यात आली आहे. चिखलीमार्गे येणार्या बसेसकरिता पिंपळगाव सराईकडील बाजूला बसस्थानक असेल. तर धाडमार्गे येणार्या गाड्यांसाठी ढासाळवाडी येथे बसस्थानकाची व्यवस्था केली आहे. औरंगाबाद, जालनाकडून येणार्या बसेससाठी भडगावकडील बाजूस बसस्थानकाची सोय करण्यात आली आहे.