बुलडाणा - देशात आणि राज्यात गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने सर्वसामान्य माणूस हतघाईला आल्याचं दिसून आलं. संपूर्ण जगाला कोरोनाने हादरुन सोडलं, त्यात सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. तर, छोट्या-मोठ्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळसुद्धा आली. छोट्या व्यवसायिकांनी उसनवारी, व्याजाने पैसे आणून व्यवसाय सुरू केला होता, त्याचाच प्रत्यय जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये पाहायला मिळाला. भाजी विक्रेत्याने लावलेला बोर्ड सध्या चर्चेचा आणि संवेदनशीलतेचा विषय बनला आहे.
एका भाजीविक्रेता व्यावसायिकाने आपल्या भाजीच्या गाडीवर एक फलक लावला असून त्यावर त्यानी "उधारी पूर्ण बंद केली आहे, उधार मागूच नका, व्याजानी पैसे आणुन व्यवसाय सुरू केला आहे, नगदी पैसे द्या. भीक मागायची वेळ आली आहे'', असा आशय लिहिला आहे. तो भाजीविक्रेता फलक लावून गल्लो गल्ली जाऊन भीजीविक्रीचा आपला व्यवसाय करत आहेत. या भाजीपाला विक्रेत्याची अनोखी शक्कलची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
मलकापूर शहरातील माता महाकाली नगरातील रहिवासी भाजिविक्रेता राजू दाते हे मागील 15 ते 20 वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र कोरोना काळात सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. त्यामध्ये नुकसान सर्वांचेच झाले होते, भजीविक्रेता राजू दाते यांनाही त्याची झळ बसली. तब्बल दोन वर्षांनी कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर सर्व व्यवसाय सुरू झाले आहेत. बाजापेठेत व्यवसायाची मंदी असली तरी सर्व सामान्य दोन वेळचे पोट मात्र छोटा-मोठा व्यवसाय करून भागवत आहेत. राजू दाते यांनी सुद्धा आपला व्यवसाय पुन्हा कसाबसा सुरू केला आहे. मात्र, हा व्यवसाय सुरू करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे, त्यांनी व्याजाने पैसे आणून भाजीपाला व्यवसाय सुरू केला. तो चालू ठेवण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढविली. त्यांचे आवाहन किंवा विनंतीफलक हे हास्यस्पद असले तरी खरोखर हीच वस्तुस्थिती आहे, अशीही चर्चा या फलकाला पाहून होत आहे.