हनुमान जगताप / मलकापूरविदर्भाचे प्रवेशद्वार मानल्या जाणार्या मलकापूर नगरीत छोट्या व जडवाहनांमुळे रहदारी प्रचंड वाढली आहे. अशात जनसामान्य नागरिकांमध्ये बैचेनी वाढली असून, तालुक्यातील घिर्णी, दाताळा या बायपास मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील नवीन सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा शहरात व्यक्त होत आहे.मलकापूर येथील महत्त्वाच्या मानल्या जाणार्या तहसील चौक, हनुमान चौक, बसस्थानक चौक या ठिकाणी दिवसभरात किमान दहा वेळा चक्काजाम होतो. आठवडी बाजार आणि सणासुदीच्या काळात तर अक्षरशा वाहनांची रेलचेल असल्याने चक्काजाम दिवसभरात अनेकदा होतो. शहरात नांदुरा, मुक्ताईनगर व बुलडाणा, बोदवड या चार ठिकाणावरून वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात बाहेरून येणारी वाहने अन शहरातील वाहने यांची संख्या पाहता, प्रत्येक चौकात वाहनांची अन वाहनांचीच भाऊगर्दी निदर्शनास येते. त्यामुळे शहरातील मुख्य चौकात दिवसातून अनेकदा चक्काजामचा अनुभव नागरिक घेतात, हे वास्तव आहे. यात प्रामुख्याने जड वाहने, जी मुंबई, नागपूर, जालना, औरंगाबाद या ठिकाणावरून ये-जा करतात, त्यांचाही मोठा सहभाग आहे. जर मलकापूर तालुक्यातील बेलाड-घिर्णी व दाताळा या दरम्यानच्या बायपास रस्त्याची निर्मिती झाल्यास शहरातील रहदारीवरचा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होऊ शकतो. शहरात पोलिसांची ट्राफिक यंत्रणा काम करते, हे जरी खरं असलं तरी वाहनांची भाऊगर्दी रोखण्यासाठी मलकापूर तालुक्यात घिर्णी बायपास रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, राज्यातील नवीन सरकारने तातडीने बायपासचा प्रश्न मार्गी लावून शहरातील वाहतुकीचा कोंडी सोडवावी, अशीे शहरातील जनसामान्यांची शहरातील सुज्ञ लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
रहदारीमुळे बायपासचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Published: October 29, 2014 10:39 PM