बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील सी आर्म मशीन गत काही दिवसांपासून बंद आहे. तसेच इतर मशीनही अत्याधुनिक नसल्याने डाॅक्टरांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे मशीन बंद असल्याने रुग्णांना औरंगाबाद, जालना, अकाेला येथे जावे लागत आहे.
बुलडाणा शहरासह रुग्णांना चांगल्या आराेग्य सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात आले आहे. विविध आजारांवर उपचार करण्यासाठी परिसरातील रुग्ण माेठ्या संख्येने येतात. रुग्णालयातील अनेक मशीन जुन्या काळातीलच आहेत. एकीकडे नवनवीन यंत्रांचा शाेध लागत आहे. अत्याधुनिक यंत्रांचा वापर उपचार करताना करण्यात येत आहे. मात्र, बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णाालयात जुन्याच मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बहुतांशी मशीन या अद्ययावत करण्याची गरज आहे. दुसरीकडे लाखाे रुपये किंमत असलेली सी आर्म एक्स-रे मशीन काही दिवसांपासून बंद पडली आहे. दहा वर्षांपूर्वी ही मशीन रुग्णालयात आणण्यात आली हाेती. तेव्हापासून आतापर्यंत त्यावरच रुग्णांची तपासणी करण्यात येत हाेती. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. ती दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन सी आर्म एक्स-रे मशीन देण्यात यावी, अशी मागणी रुग्णांकडून करण्यात येत आहे.
शस्त्रक्रियेत हाेताे वापर
शस्त्रक्रिया करण्यासाठी सी आर्म एक्स-रे मशीनचा वापर करण्यात येताे. ही मशीन बंद पडल्याने रुग्णांना औरंगाबाद, जालना, अकाेला येथे न्यावे लागत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सी आर्म मशीन देण्याची गरज आहे.
ओपीडी
दरराेजची ओपीडी
८००