बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एकप्रकारे कोरोनाने दहशतच निर्माण केली आहे. कोरोनाचा सर्वच क्षेत्रांत परिणाम जाणवत आहे. कोरोनामुळे अनेक जण पथ्य पाळत आहेत. कोरोना विषाणू फुफ्फुसांवर अटॅक करीत असल्यामुळे थंड पाणी पिण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे.
कॅनचे थंडगार पाणी पिण्याऐवजी नागरिक घरचे साधे, माठातील पाणी पिण्याकडे वळले आहेत.
कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यापैकीच एक असलेला कॅनमधील थंडगार पाण्याचा व्यवसायसुद्धा चांगलाच मंदावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लग्नकार्य, वाढदिवस, मुंज व इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. लग्न समारंभ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. गतवर्षांपासून लग्नसमारंभांसोबतच इतर कार्यक्रमही थांबले आहेत. लग्नकार्य म्हटले की, प्यायला पाणी लागतेच. हजार-दोन हजार पाहुण्यांसाठी पाण्याच्या कॅनशिवाय पर्याय नसायचा. परंतु, आता लग्नच नाहीतर पाण्याच्या कॅनला कोण विचारतोय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच शासनाने आता १५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. दुकानदार, भाजीपाला, किराणा व्यावसायिकांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुकाने, प्रतिष्ठानांमध्ये लागणाऱ्या थंडगार पाण्याचे कॅनसुद्धा बंद झाले आहेत. थंडगार पाण्यामुळे सर्दी, खोकला व फुफ्फुसावर परिणाम व्हायला नको. म्हणून नागरिक काळजी घेत आहेत. अनेक घरांमध्ये सुरू असलेले कॅन बंद केले आहेत. कोरोना येण्यापूर्वी बुलडाणा शहरात शेकडाे लिटर शुद्ध जल वापरले जायचे. परंतु, कोरोनाने पाण्याच्या कॅनचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दररोज २०० पाण्याच्या कॅनची होणारी विक्री आता केवळ ४० ते ५० कॅनवर आली आहे. त्यामुळे पाणी व्यावसायिकसुद्धा हवालदिल झाले आहेत. पाण्याच्या टँकरचा व्यवसायही मंदावल्याचे चित्र आहे.
पालिकेकडे १७ प्रकल्पांचीच नोंद!
नगर पालिका प्रशासनाच्या परवाना विभागाकडे शहरातील केवळ १७ आरओ प्लांटचीच नोंदणी आहे. सध्या बुलडाणा शहरामध्ये ३० ते ३५ तसेच शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतही २० ते ३० आरओ प्लांट सुरू आहेत़ अनेक पाण्याचे प्रकल्प अवैधरीत्या सुरू आहेत. अनेकांकडे शासनाची परवानगी नसताना, आरओ प्लांट सुरू आहेत. परंतु त्यांच्याविरुद्ध नगर पालिका प्रशासनाला कारवाई करण्यास वेळ नाही. नगर पालिका प्रशासनाने केवळ नाेटीस बजावल्या आहेत़
कोरोनामुळे सध्या लग्न समारंभ व इतर कार्यक्रम बंद आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शासनाने व्यवसायाची वेळ कमी केल्यामुळे दुकानदार, व्यावसायिकांनी पाण्याच्या कॅन बंद केल्या आहेत. त्यामुळे कॅनमधील पाण्याचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
-प्रमाेद गावंडे, विक्रेता
कोरोनामुळे थंडगार पाणी कोणी पीत नाही. माठातील व घरातील साधे पिणे सोयीचे आहे. उगाच आरोग्यासोबत खेळ नको. उन्हाळ्याचे दिवस असूनही थंड पाणी पिणे सध्या टाळत आहोत. त्यामुळे घरी येणारी पाण्याची कॅन बंद केली आहे़
-प्रेमसागर खिल्लारे, नागरिक