लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: नागपूर-मुंबई महामार्गावर भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी मेहकर बायपासनजीक दुपारी घडली. या अपघातामध्ये मेहकर येथील डॉक्टर कैलास रहाटे जागीच ठार झाले. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. शुक्रवारी दुचाकीवर (एमएच-२८-एक्यू- ६८११०) बायपासवरून जात होते. यावेळी स्थानिक एका हॉटेलनजीक भरधाव वेगात येणाऱ्या एमएच-१४-इएस-२६७३ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात डॉ. केलास रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून नागपूरकडे जाणारी कार आणि डाॅ. रहाटे या दोघांच्या वाहनात ही जबर धडक मेहकर बायपासवर सोनाटी चौफुलीकडे जात असताना झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी कारसोबत फरफटत रोडलगत असलेल्या नालीत गेली तर कार रस्त्याच्या कडेला उलटली. या कारमध्ये दोन लहान मुले त्यांच्या आईसह प्रवास करत होते. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या डॉ. कैलास रहाटे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मेहकर तालुक्यातील शेंदला येथील रहिवासी असलेले डॉ. कैलास रहाटे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले आहे.
कारची दुचाकीला धडक; मेहकर येथील डॉक्टर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 12:43 PM