वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे.परंतु गत वर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त चालणारे गावोगावी सामूहिक, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ, उपासना चालत असतात़ याला टाळ, वीणा, पखवाजाची साथ असते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे. मार्च महिन्यापासून हरिनाम सप्ताह, यात्रा, मेळावे, उत्सव मोठ्या प्रमाणात चालू होतात. या काळात गावोगावी हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कीर्तनकार, पखवाजवादक वीणेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकारही या दिवसांत व्यस्त राहतात. परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे संचारबंदी, कधी लॉकडाऊन चालूच आहे. यामुळे सर्व सामूहिक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. एप्रिल-मे महिन्यात हरिनाम सप्ताहात काकडा, आरती, गाथा पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच गावात स्नेहभोजन दिनक्रम चालू असतात. गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामूहिक भजन, आरबडी मंडळ भजन व दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरामध्ये सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ होत असतो. त्यामुळे मंदिर परिसरात आनंदमय वातावरण निर्मित होते. चैत्र महिन्यात बऱ्याच ठिकाणी देवी संस्थानच्या वतीने यात्रा भरविण्यात येत होते. रामनवमीचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता़ भीतीने व लागू असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये, यासाठी तुकाराम महाराज, गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये बसून त्या तिथीवर केले आहे.
काेराेनामुळे टाळ, वीणा, पखवाजाचा निनाद थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:37 AM