डाेणगाव : शासकीय व खासगी दवाखान्यात कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे़
सुबाेध सावजी यांनी पत्रात म्हटले आहे की, गत काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे सर्वसामान्य जनता भयभीत झालेली आहे. लहानांपासून मोठ्या शहरापर्यंत कोणताही खासगी दवाखाना असो किंवा सरकारी दवाखान्यात रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे़ उपचारासाठी सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. खासगी दवाखान्यात उपचार करण्यासाठी हजारो रुपये लागत आहेत. शासकीय दवाखान्यात उपचाराचे पैसे घेत नाही; परंतु रुग्णाला बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. ही औषधे सुद्धा सामान्य नागरिकाला परवडत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. आंध्र प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे राज्यात खासगी व शासकीय दवाखान्यात पूर्ण उपचार व त्याकरिता लागणारी औषधे मोफत केली आहे. त्याप्रमाणे राज्यात याचे अनुकरण करावे, असेही सुबाेध सावजी यांनी म्हटले आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून लॉकडाऊन, विकेंड लॉकडाऊन, अंशत: लॉकडाऊन हे प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे, अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने माेफत धान्य देण्याची घाेषणा केली असली तरी अजूनही वाटप सुरू झालेला नाही़ पोट भरण्यासाठी फक्त गहू, तांदूळ पुरेसे होत नाही. तर त्यासाठी तेल, मीठ इतर कोणतेही दाळ व चूल पेटवण्याकरिता लाकूड किंवा गॅस पाहिजे, त्यासाठी सवलत देताना याचाही विचार करावा, तसेच अनेक शेतकरी काेराेना पाॅझिटिव्ह आहेत़ त्यांना उपचाराचा खर्च झेपावणारा नाही. त्यामुळे राज्यात खासगी व शासकीय रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व लागणारी औषधे मोफत देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे.