ओमप्रकाश देवकर, मेहकर : तालुक्यात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाची निवड करून दूध उत्पादन करून विक्री सुरू केली. मात्र, मागील वर्षापासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने दुधाची खुली विक्री करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मेहकर तालुक्यात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये फळबाग, भाजीपाला यांचे चांगले उत्पादन घेत शेतीला शेणखत मिळावे व घरामध्ये नगदी पैसा यावा या उद्देशाने दूध उत्पादन करण्याच्या उद्देशाने व्यवसाय सुरू केले. सगळे सुरळीत सुरू असताना मागील वर्षापासून काेरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. यामुळे दुधाची किरकोळ व रतिबाने विक्री करणारे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. याशिवाय पशुखाद्याच्या दरामध्येसुद्धा अनपेक्षित अशी मोठी वाढ झाली आहे. जनावरांच्या किमती बाजार बंद असल्यामुळे गगनाला भिडल्या आहेत. बाजार बंद असल्यामुळे चांगल्या प्रतीची जनावरे विक्रीसाठी बाजारात येत नाहीत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व नियोजन कोलमडले आहे. तालुक्यात अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे बाहेरील मजूर कामावर आहेत. मात्र, लाॅकडाऊनमुळे गावाकडे गेलेले मजूर परत न आल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
दुधाळ जनावरांच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. यासोबतच पशुखाद्याच्या दरात मोठी तेजी आली आहे. यामुळे उत्पादनाचा व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. -विशाल दळवी, दूध उत्पादक शेतकरी.
आमच्याकडे दुधाळ म्हशी असून, निघणाऱ्या दुधाची विक्री मेहकरला किरकोळ स्वरूपात करीत असतो. मात्र, लाॅकडाऊन लागल्यापासून दूध नेण्यासाठी दूध केंद्रावर नागरिक येत नसल्याने दूध विक्रीची मोठी समस्या निर्माण झाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
- विष्णू तनपुरे, दूध उत्पादक शेतकरी, जयताळा.