विवेक चांदूरकर, शेगाव (जि. बुलढाणा) : गर्भवती महिलेवर चुकीचा उपचार केल्याच्या तक्रारीवरून शेगावचे डॉ. प्रवीण नागरगोजे व खामगाव येथील डॉ. गणेश महाले यांच्याविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी २३ मे रोजी विविध कलमांन्वये न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल केला.
शीतल नीलेश ढोले (वय २५) तर्फे शेगावमधील राज राजेश्वर कॉलनीतील रहिवासी ॲड. नीलेश रामदास ढोले यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. शीतल ढोले गर्भवती असताना तिने शेगाव येथील खामगाव रोड जगदंबा चौकातील डॉ. प्रवीण नागरगोजे (वय ४२) यांच्याकडे उपचार घेतला. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार खामगाव येथील डॉ. गणेश महाले यांच्याकडे केला. २९ जुलै २०२२ रोजी डॉ. प्रवीण नागरगोजे यांच्या रूग्णालयात मुलीला जन्म दिला.
त्यानंतर त्या मुलीचा अकोला व मुंबई येथील बालरोगतज्ज्ञांकडे उपचार केला असता तेथील डॉक्टरांनी गर्भवतीवर चुकीचा उपचार घेतल्याबाबतची माहिती दिली. डॉ. प्रवीण नागरगोजे व डॉ. गणेश महाले यांनी महिला गर्भवती असताना चुकीचा उपचार केल्यामुळे त्या महिलेला ७ ते ८ लाख रुपये खर्च सोसावा लागला. भविष्यातसुद्धा खर्च लागणार आहे. शीतल ढोले यांनी साक्षीदार डॉ. अतुल राजपुत यांच्याकडे उपचार केला असता डॉ. नागरगोजे व गणेश महाले या दोघांनी त्या महिलेच्या उपचाराची गंभीरतेने दखल घेतली नसल्याचे स्पष्ट झाले.
अॅड. नीलेश ढोले यांच्याद्वारे विद्यमान न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून २३ मे रोजी न्यायालयाच्या आदेशाने दोन्ही डॉक्टरांविरुद्ध कलम १५६ (३) सीआरपीनुसार शेगाव पोस्टेला कलम २६९, २७०, ४२०३४ भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला.