बुलढाणा : येथील पोलीस रुग्णालयातील काही साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. ही घटना १० ते ११ मार्च दरम्यान घडली होती. याबाबत तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने तक्रारही दिली. मात्र, प्रकरणात तब्बल १० दिवसानंतर २० मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस रुग्णालयात कार्यरत असलेले प्रमोद मधुकर कुळकर्णी (५६) यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस रुग्णालयात १९९८ पासून कार्यरत आहेत. ते १० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता हॉस्पीटल बंद करुन घरी गेले होते. ११ मार्च रोजी सकाळी ड्युटीवर आले असता त्यांना हॉस्पीटलचे कुलुप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहले असता हॉस्पीटलमधील इन्व्हटरची बॅटरी, दोन जुने स्टॅंड पंखे, जुनी पितळी पाण्याची टाकी आणि जुन्या वापरातील प्लास्टिकच्या खुर्च्या असे एकुण ३ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणात २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अज्ञात महिला
शहर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस रुग्णालयात चोरीप्रकरणात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक तर दहा दिवसानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तपासाची गतीही मंदावल्याचे दिसून येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"