या कारवाईत पोलिसांनी एकूण ५४ गुरे ताब्यात घेतली असून, चार गुरांचा मृत्यू झाला आहे. सध्या ही गुरे मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील गोशाळेत ठेवण्यात आली आहेत. त्यातील काही जखमी आहेत. मलकापूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या गुरांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. २० फेब्रुवारी राेजी बोराखेडी पोलिसांचे पथक गस्तीवर असताना तरवाडी फाट्यावर ग्रामस्थांनी कथितस्तरावर कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या पशुधनासह एक कंटेनर पकडून ठेवल्याची माहिती नंदकिशोर धांडे, गजानन खुरपडे, रामदास गायकवाड यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने त्यांनी घटनास्थळ गाठले व कंटेनर ताब्यात घेतला. २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरजे-०९-जीसी-५२२३ क्रमांकाचा कंटेनर व ग्रामस्थांनी पकडून ठेवलेल्या कंटेनरचा क्लिनर वकील अली अजीज अली (३३, सारंगपूर, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान असलम नामक ट्रक चालक पळून गेल्याची माहिती आहे. १८ फेब्रुवारी रोजी आरोपी मध्य प्रदेशातील गुणा येथून ही गुरे घेऊन वरणगावसाठी निघाले होते. गुणा-भोपाळ, हौसिंगाबाद, अकोला, खामगाव-मोताळा मार्गे ते जात असताा तरवाडी येथे त्यांना ग्रामस्थांनी पकडले होते. दरम्यान, याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी विविध कलमासह जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनासह प्राण्यांचा छळ व त्यातील काही प्राण्यांच्या मृत्यूप्रकरणी बशीर चढ्ढा (रा. वरणगाव), चालक असलम (रा. आष्टा), वकील अली अजीज अली व ट्रक मालक सुराभ अली हनना वस्ताद (सारंगपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुटाराच्या पोत्यांच्या थप्पीआड ही गुरे कंटेनरमध्ये टाकण्यात आली होती.