उदयनगर : येथून जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा येथे गुरांच्या गोठ्याला ३० डिसेंबरच्या रात्री अचानक आग लागली़. या आगीत तीन जनावरे भाजल्याने ठार झाली तर चार गंभीर जखमी झाले. या घटनेत शेतकऱ्याचे सहा लाख ५८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़.
टाकरखेडा येथील अनंता तुकाराम पैठणे यांच्या राहत्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्याला ३० डिसेंबरच्या रात्री उशिरा अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धावाधाव सुरू केली, परंतु आग आटोक्यात यायला बराच वेळ लागला. तोपर्यंत या आगीत दोन बैल अंदाजे ९० हजार रुपये, एक गाय पंधरा हजार रुपये असे तीन जनावरांचा मृत्यू झाला. दोन काठेवाडी घोडे अंदाजे किंमत तीन लाख रुपये, एक गोरा पंचवीस हजार रुपये, एक वासरी १३ हजार रुपये तसेच शेती उपयोगी अवजारे, जनावरांचे कुटार, इतर सामान अंदाजे पन्नास हजार असे एकूण सहा लाख ५८ हजारांचे नुकसान झाले आहे. टाकरखेड हेलगा तलाठी चिंचोळकर तसेच चिखली पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. अमोल पडोळ, डॉ. केशव शिंदे, सहायक पशुधन अधिकारी करवंड, परिचर काळे यांनी जखमी जनावरांचे उपचार केले. तलाठी यांनी पंचांसमक्ष पंचनामा केला. यावेळी येथील सरपंच पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत देण्याची मागणी होत आहे.