चिखली : लाेकसहभागातून सुरू होत असलेल्या ‘आधार कोविड केअर सेंटरचे १६ मे रोजी दुपारी चार वाजता माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते रुग्णार्पण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी भाजपचे राज्य उपाध्यक्ष, माजी पालकमंत्री आ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, चैनसुख संचेती, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. येथील स्व. राजाभाऊ बोंद्रे नगरपालिका शाळेच्या नवीनतम भव्य व प्रशस्त वास्तूमध्ये आ. श्वेता महाले यांच्यावतीने शासन व लोकसहभागातून आधार कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. हे कोविड सेंटर ५०- २० खाटांचे असून, २० खाटा ऑक्सिजनच्या आहेत. ५० खाटा सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहेत. याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे पूर्ण उपचार मोफत करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी औषधे, तपासण्या, नाश्ता, जेवणसुद्धा मोफत देण्यात येणार आहे. तसेच छाप येथेही ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून, धाड येथील कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नाही. खासगी दवाखान्यात पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाही. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडसाठी वणवण फिरत आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यांना काही प्रमाणात का होईना आ. श्वेता महाले यांच्यावतीने आधार देण्यासाठी चिखली आधार कोविड रुग्णालय सुरू करून त्यात मोफत उपचार देणार असल्याने रुग्ण व नातेवाईक यांना फार मोठा आधार मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी केवळ परवानगी मिळालेल्या व्यक्तींशिवाय कुणालाही प्रवेश असणार नाही. फडणवीस व आ. महाले यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी गर्दी न करता फेसबुक लाईव्हवरूनच कार्यक्रम पाहावा असे आवाहन आ. महाले यांनी केले आहे.