राेजगार मेळावा, समुपदेशन कार्यशाळा
बुलडाणा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने २७ ते ३० मे या दरम्यान वेब पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात नामवंत कंपन्यांचे विविध पदाकरिता ऑनलाईन भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविला.
मालवाहू वाहनाची कारला धडक
बुलडाणा : मालवाहू वाहनाने कारला समोरून जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास राजूर घाटात घडली. या प्रकरणी मालवाहू चालक सरदारसिंह हनुसिंग राजपूत (रा. मलकापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
राजीव सातव यांना अभिवादन
किनगावराजा : काँग्रेसचे राज्यसभा सदस्य स्व.राजीव सातव यांच्या अस्थिकलशाचे किनगावराजात आगमन झाले असता काँग्रेसच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच संजीवनी कायंदे, माजी सरपंच वामन झोरे, दत्तात्रय झोरे, उत्तम झोरे, बाबूराव राजे, अविनाश राजे व इतर उपस्थित हाेते़
मार्ग बदलून रेतीची अवैध वाहतूक सुरूच
सिंदखेडराजा : घाट नसलेल्या ठिकाणाहून वाळू उपसा व वाहतूक सातत्याने सुरूच आहे. त्यासाठी फक्त मार्ग बदलण्यात येत आहे़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
‘त्या’ मारहाणीचा भाजपने केला निषेध
बुलडाणा : जालना येथील भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना पाेलिसांनी केलेल्या मारहाणीचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला़ तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा भाजप युवा मोर्चाचे बुलडाणा शहराध्यक्ष सोहम झाल्टे यांनी दिला आहे़
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा
बुलडाणा : राज्य शासनाने इयत्ता दहावीचे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे़ दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी हाेत आहे़ काेराेनामुळे आधीच पालक माेठ्या संकटात सापडले आहेत़
मन तंदुरुस्त हाेण्याची गरज
चिखली : कोरोनाच्या या संकटकाळात हरिनाम, भजन, कीर्तन आणि अध्यात्म मानसिक उपचारांसारखेच ठरतात. मन तंदुरुस्त झाले तर शरीर आपोआप तंदुरुस्त होते. मनाला निरोगी ठेवण्यासाठी हरिनामाची आवड असणे आवश्यक आहे, असे मत पुरुषोत्तम महाराज यांनी व्यक्त केले़
बुलडाणा शहरात स्टॅम्प पेपरचा तुटवडा
बुलडाणा : कोरोना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. पेरणीचे दिवस समोर येऊन ठेपले असताना शेतकरी पीक कर्जासाठी धडपडत करीत आहे. जोपर्यंत शेतकरी स्टॅम्प पेपर बँकेत जमा करीत नाही तोपर्यंत बँक पीक कर्ज देत नाही. त्यात काही स्टॅम्प पेपर दुकानदारांनी स्टॅम्प पेपरचा तुटवडा निर्माण केल्याचे चित्र आहे़
बुद्धजयंतीनिमित्त केले भाेजनदान
बुलडाणा : शहरातील श्री महालक्ष्मी आराधी मंडळाच्या वतीने बुद्ध जयंतीनिमित्त स्त्री रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना भात व खिरीचे वाटप केले़
कृषी पंपांना रात्रीही वीजपुरवठा द्या
बुलडाणा : मागील काही दिवसांपासून शेती पंपाचा रात्रीचा बंद असलेला सिंगल फेज वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी ‘स्वाभिमानी’च्या वतीने करण्यात आली आहे़
अवैध गावठी दारू विक्री वाढली
देउळगाव राजा : तालुक्यात काेराेना संक्रमणाच्या काळातही अवैध गावठी दारूची विक्री हाेत असल्याचे चित्र आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच देउळगाव राजात छापा टाकून दारू जप्त केली हाेती़