सिंदखेडराजा : लोककवी वामनदादा कर्डक यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचा जन्मशताब्दी महोत्सव शासनस्तरावर साजरा व्हावा, अशी मागणी लोकजागर संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. लोकजागरचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी सोमवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
वामनदादांनी आपल्या साहित्याच्या व गाण्यांच्या माध्यमातून, बहुजन चळवळीची परिवर्तनाची पताका आपल्या खांद्यावर घेत, गीतांच्या माध्यमातून विचारांची पेरणी केली. उपेक्षित वंचित समाजाचे दुःख, अन्याय, अत्याचार त्यांनी आपल्या गाण्यात मांडले. आपल्या आयुष्यातील ६१ वर्षे दादा सजसेवेचा वसा घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या पायाला भिंगरी बांधून राज्यभर फिरले. त्यांच्या या कामाची दखल समाजाने घ्यावी, यासाठी लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासन स्तरावरून साजरे व्हावे, अशी आग्रही मागणी लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते यांनी केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचीही मागणी
लोककवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष शासनस्तरावर साजरे व्हावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेनेदेखील केली आहे. सेनेचे तालुकाध्यक्ष रामदास कहाळे, शाहीर अमर जाधव, शाहीर गौतम जाधव, तान्हाजी शिनगारे यांनी यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले.