लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गणेशोत्सव हा नेतृत्व गुणाला संधी देणारा उत्सव असून, या उत्सवात युवकांनी आपल्या हातून कोणतेही गैरकृत्य घडणार नाही. या कृत्याद्वारे स्वत:च्या चारित्र्याला बट्टा लागणार नाही, सोबतच सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याचीच खबरदारी युवकांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांनी येथे केले.
बुलडाणा जिल्हा पोलिस गणेशोत्सव-२०१८ अंतर्गत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी शांतता समिती सदस्यांच्या समन्वय समिती बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस उप महानिरिक्षक तरवडे म्हणाले की, सण उत्सवाच्या कालावधीत सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केल्या जातात. मात्र, तरुणांनी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता. सण, उत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक एकोपा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. दरम्यान, मराठा आरक्षण मोर्चामुळे प्रलंबित असलेली ७२ हजार जागांसाठी मेगा भरती नजीकच्या कालावधीत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या कालावधीत नोकर भरतीची तयारी करणाºयांनी आपल्यावर गुन्हे दाखल होवून चारित्र्याला कलंक लागणार नाही. याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी शरद वसतकार, दर्शनसिंह ठाकूर, गजाननराव देशमुख, अनिस जमादार, अमोल अंधारे यांची समयोचित भाषणे झालीत. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधिक्षक श्याम घुगे यांनी केले. संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रदीप देशमुख यांनी केले. आभार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी मानले. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख, पीएसआय रविंद्र लांडे, कांबळे, माने आदींची उपस्थिती होती.
सहकार्य भावनेतून सलोखा जोपासा!
- संवेदनशील शहर म्हणून खामगावकडे पाहल्या जात असले तरी, गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार खामगावात या उत्सवाच्या कालावधीत घडला नाही. ही प्रेरणादायी बाब असून, सहकार्य भावनेतून सामाजिक सलोखा जोपासा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी केले.