बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. यावर्षी १४ एप्रिल ते १३ मे २०२१पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षी पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र न येता फिजिकल डिस्टन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क. सॅनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करावा.
या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात. संध्याकाळी मगरीब नमाजपूर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळे व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये जाऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड १९चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे. शब - ए - कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुरआन पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु यावर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.
खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन
पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करावे. धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करावेत. राज्यात १४४ कलम लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़