योगेश देऊळकार,संग्रामपूर : तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठण, रामचरितमानस पठण, सुंदरकांड पठण करण्यात आले.
रामनवमी ते हनुमान जन्मोत्सव दिनापर्यंत सांप्रदायिक मंडळांकडून रामधून फेऱ्या काढण्यात आल्या. एक दिवसीय हरिनाम संकीर्तनाचे आयोजन व पौर्णिमेला सूर्योदयी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप झाले. तालुक्यातील वस्ती नसलेल्या प्राचीन हनुमान मंदिरामध्येही विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये सोनाळा-हिवरखेड रोडवरील संग्रामपूर तसेच एकलारा गावाजवळील बानोदा, वाननदी तीरावरील खळद खुर्द या गावातील हनुमान संस्थानचा समावेश आहे.
वारी भैरवगड येथे भक्तांची मांदियाळी-
अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारी भैरवगड येथे ८० वा जन्मोत्सव सोहळा पार पडला. सातपुड्याच्या पायथ्याशी तिहेरी संगमावर असलेले निसर्गरम्य वातावरण, हजारोंच्या संख्येने भाविकांनी जागृत हनुमानाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी वारी येथील हनुमान मंदिराच्या विश्वस्त मंडळाने नियोजन केले. महंत कृष्णानंद भारती सिद्धपीठ श्री क्षेत्र वारी हनुमान यांच्या मार्गदर्शनात संस्थानचे सचिव डॉ. प्रमोद विखे यांच्या उपस्थितीत तसेच वारी हनुमान सेवाधारी ग्रुपच्या प्रयत्नाने जन्मोत्सव सोहळा पार पडला.