- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यातील स्मशानभूमींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अनेक गावांत साधे टीनशेड अद्यापपर्यंत उभारले नाहीत. ज्या गावात टीनशेड आहेत, त्यातील अनेकांची खस्ता हालत आहे. अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहे की जंगल, असे दृश्य असल्याने मृृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करावे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात १४३ गावे आहेत. त्यातील २५ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमीची व्यवस्थाच उभी झालेली नाही. ज्या गावांमध्ये टीनशेड आहे तिथे पुरेशा सुविधा नाहीत. स्मशानभूमींवरील निकृष्ट पत्रा व लोखंड भंगारात गेल्याने तालुक्यातील कित्येत स्मशानभूमींवर छप्परच नाही. ज्या काही मोजक्या गावात टीनशेडची अवस्था चांगली आहे तिथे संरक्षण भिंत, कूूंपन व योग्य देखभाल दुरूस्तीचा अभाव आहे. दाहिन्यांचे कठडे तुटलेले आहेत. अवतीभोवती झुडुप वाढलेली आहेत. पाण्याची व्यवस्था नाही. अनेक गावातील स्मशानभूमीत गावातीलच लोक शौचाला जातात. परिणामी परिणामी शेतांमध्ये, नदीकाठी उघड्यावर मृतांवर अत्यंसस्कार केले जातात. पावसाळ्यात अत्यंसस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. शहरातील स्मशानभूमींना बगिचासमान रूप येत असताना याउलट चित्र ग्रामीण भागात आहे.
शेडची व्यवस्था नसलेली गावे अंत्री खेडेकर, बेराळा, पांढरदेव, मंगरूळ, मुंगसरी, सावरगाव डुकरे, बोरगाव वसु, पळसखेड जयंती, कोलारा, सावंगी गवळळी, किन्ही सवडद, भानखेड, जांभोरा, सवणा, असोला नाईक, मेडसिंगा, उत्रादा, टाकरखेड हेलगा, करवंड, अंत्री कोळी (वाघापूर), करणखेड, अमडापूर (बौध्द स्मशानभूमी), हरणी (मागासवर्गीय व हिंदु स्मशानभूमी), अंबाशी (मागासवर्गीय, मुस्लीम कब्रस्तान व हिंदु स्मशानभूमी), किन्ही नाईक, या गावात स्मशानभूमीची व्यवस्था नाही. तर काही गावात मुस्लीम कब्रस्थानची व्यवस्था नाही. शिवाय बहुतांश गावात धर्म व जातीव्यवस्थेनुसार स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी असूनही ती व्यवस्था अद्याप झालेली नाही.