सिंदखेड राजा : सोमवार असल्याने तहसील कार्यालयाचा परिसर गजबजलेला होता. जो तो आपल्या कामात मग्न असतानाच... अचानक मंगलवाद्यांचा स्वर कानावर आला आणि सर्वांचेच लक्ष एका अनोख्या आंदोलनाकडे वळले.. तहसील परिसरात चक्क एक लग्न लागत होते... वराती, वाजंत्री, नटलेले वर, वधू...आणि मंगलाष्टके असा सर्व थाट इथे होता.
कायमच आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वाभिमनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथेही आज अनोखे आंदोलन केले. राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा धिक्कार करीत या कार्यकर्त्यांनी चक्क केंद्र आणि राज्य सरकारचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ज्याप्रमाणे नवरा-नवरी एकत्र येऊन संसार करतात त्याचप्रमाणे दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन शेकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची हाक दिली.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याची भरपाई सोडाच; पण पीकविमादेखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांची ही थट्टा थांबवून तत्काळ मदत करावी, पीकविमा कंपन्या विमा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले. पीकविम्याची वरात सरकारच्या दारात असे फलक घेऊन जिजाऊ जन्मस्थळापासून वाजतगाजत निघालेली ही वरात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आली. येथे हा प्रतीकात्मक लग्नसोहळा पार पडला. यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.