चिखली/ मेहकर : सर्वत्र गुटखा बंदी असतानाही परराज्यातून छुप्या पद्धतीने गुटख्याची तस्करी करून जिल्हय़ात विक्री करणार्या गुटखा माफियाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. चिखली शहरातील बाबू लॉज चौकातील एका गोडावूनमधून पोलिसांनी सुमारे साडेचार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी फरार झाला आहे. तर मेहकर येथे केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. चिखली व मेहकर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून, या कारवाईत एकूण सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर असे की, गुप्त माहितीवरून रात्रीची गस्त घालताना चिखली पोलीस पथकाने येथील जिल्हा सहकारी बँकेजवळील चौकात वाहनांची तपासणी केली असता एका मालवाहू टाटा अेस वाहन क्रमांक एम.एच.२८ अेबी. २२९४ मध्ये सुमारे १ लाख ३७ हजार रुपयांचा गुटखा मिळून आला होता. याबाबत वाहन चालकाच्या चौकशीमध्ये त्याला हा माल स्थानिक बाबू लॉज चौकातील एका घरामधून मिळाला असून, हा माल चिखली शहरातील एका माजी पालिका पदाधिकार्यांच्या भावाचा असल्याची माहिती चालकाने पोलिसांना दिली. याच दरम्यान मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मा यांनी त्यांच्या हद्दीमध्ये एका वाहनामध्ये मोठय़ा प्रमाणात गुटखा पकडला असल्याची माहिती दिली. सदर गुटखा संबधितांने बाबू लॉज परिसरातील एका घरामधून याच व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली असता ताबडतोब या घरावर छापा घालण्याची प्रक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी शर्मा आणि चिखलीचे ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली. यामध्ये सुमारे ४ लाख ३१ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी असलेले शेख अकरम शेख अकबर आणि युनुसखा कदीरखा कुरेशी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चिखली आणि मेहकर पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमध्ये ११ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
चिखली, मेहकरात ११ लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: January 07, 2015 12:26 AM