लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने सिंचना सोबतच बिगर सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याने शेती सिंचनासाठी किमान दोन ते तीन आवर्तने मिळणार असून पाणीटंचाईची शक्यताही धुसर आहे. मात्र सातत्याने थकित असलेल्या पाणीपट्टी वसुलीचे आव्हान मात्र यंत्रणासमोर कायम आहे. सिंचन आणि बिगर सिंचन मिळून जिल्ह्यातील पाणीवापर संस्थांसह, औद्योगिक क्षेत्र आणि पालिकांकडे तब्बल सात कोटी रुपयांची थकबाकी आहे.यामध्ये जिल्ह्यातील पाणीवापर संस्थांकडेच चार कोटी ५१ लाख १४ हजार रुपयांची तर बिगर सिंचनापोटी दोन कोटी २५ लाख १५ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे ही थकबाकी वसूल करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या सिंचन विभागाला विशेष मोहिम आता हाती घ्यावी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या वर्षी तथा २०१८ मध्ये सिंचन विभागाने थकबाकी असलेल्या यंत्रणांना चक्क नोटीस बजावल्या होत्या. त्याचा त्यावेळी सकारात्मक परिणाम झाला होता. त्याच पद्धतीने आत ही भुमिका या विभागास स्वीकारावी लागणार आहे.
पालिकांचा विचार करता नऊ पालिकांकडे ३१ मार्च २०२० पर्यंत ३२ लाख ३२ हजार रुपयांची थकबाकी असून खामगाव, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर आणि नांदुरा या पालिकांकडे ही थकबाकी आहे. साधारणत: पालिका व ग्रामीण भागातील प्रादेशिक योजनांसाठी वर्षाकाठी ४० दलघमी पाणी आरक्षीत करावे लागते.एकीकडे पाण्याची मागणी असते मात्र थकबाकी देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांवरील कालवे, पाट व सऱ्यांची अवस्था बिक आहे. ही थकबाकी वसूल झाल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठीही मोठी मदत मिळून महत्त्म पातळीवर टेल टू हेड पाण्याची आवर्तने देणे शक्य होईल. एमआयडीसीकडे प्रामुख्याने चिखली व खामगाव एमआयडीसीकडे ७१ लाख ६८ हजार रुपयांची थकबाकी आहे.