लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: जिल्ह्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली असली तरी सिंदखेड राजा शहरासह तालुक्यातील अर्ध्या भागात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. सिंदखेड राजा शहरातील चांदणी तलाव कोरडा पडलेला आहे. त्यावरून येथील स्थितीची कल्पना यावी.एकीकडे जिल्ह्यातील आठ तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. मात्र देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार आणि मेहकर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी ही कमी आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळेच किमान पक्षी हा प्रकल्प ९४ टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या दोन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात या तालुक्यांमध्ये पावसाने प्रारंभापासूनच ओढ दिलेली होती. त्यामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील अर्ध्या भागात परिस्थिती बिकट आहे. ज्या भागात पाऊस कमी पडला आहे त्या भागातील नदीनाले, धरणे कोरडी पडली आहेत. चांदणी तलाव हा त्याचे केवळ प्रतिक म्हणावा लागले.सिंदखेड राजा सह नशिराबाद, सावरगाव माळ, अंचली, डावरगाव, तुळजापूर, सावखेड तेजन, पळसखेड चक्का सह काही ठिकाणी आजपर्यत २९८ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागातील नदी, नाले, तलाव कोरडे पडलेले आहेत. सिंदखेड राजा शहरातील चांदणी तलाव, मोती तलावही कोरडा पडा आहे. खरीपाची पीके कशीतरी हाती लागतील. मात्र रब्बीची समस्या येथे कायम आहे. परतीच्या पावसानेही सिंदखेड राजा परिसराकडे पाठ फिरवली आहे. परिसरात ढग येतात मात्र पाऊस पडत नाही, अशी स्थिती आहे. किमान पक्षी परतीचा पाऊस तरी या भागावर मेहेरबान होईल अशी आस शेतकरी वर्ग ठेवून आहे.
सिंदखेड राजात मात्र सरासरी ९४ टक्के पाऊसतालुक्यातील काही भागात पाऊस तर काही भागात नदी नाले कोरडे पडलेले आहे. अशी विचित्र स्थिती असली तरी सिंदखेड राजा तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ९३.९८ टक्के पाऊस पडला आहे. तालुक्यात ६५९.७ मिमी पाऊस वर्षभरात पडतो. त्याच्या तुलनेत येथे आतापर्यंत ६२० मिमी पाऊस झाला आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ७१ टक्के, लोणार मध्ये ७६ टक्के आणि मेहकरमध्ये ८६.३५ टक्के पाऊस पडलेला आहे. हे तालुके वगळात जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे.