चिखली : पोलीस दलात सेवा बजावताना लाखो रुपयांच्या चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चिखली येथील रहिवासी चंद्रनीलकांत किशोर सोनुने यांचा पोलीस आयुक्तांनी प्रशस्तिपत्र देऊन सन्मान केला.
चंद्रनीलकांत सोनुने हे ११ वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात आहे. दरम्यान, शांतीलाल कोठारी यांनी ३ मार्च २०२१ ला ३० लाखांचे दागिने खरेदी केले होते. ही दागिन्यांनी भरलेली बॅग गाडीत ठेवून ते फोनवर बोलत होते. त्याचवेळी पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने दागिन्यांची बॅग लंपास केली. १० मार्चला याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरा चोरीचा गुन्हा घडला होता. यामध्ये उमेश तोलाराम डोडेजा यांची ७५ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरीस गेली होती. दोन्ही घटनांप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे नोंदवून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलीस पथक नेमण्यात आले. त्यामध्ये चंद्रनीलकांत सोनुने यांचा समावेश होता. आपली कार्यकुशलता दाखवत या पथकाने दोन्ही गुन्हे उघडकीस आणले. वेशांतर करून तपास करण्यात आला. ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी करणारा आरोपी साजिद रियासत खान उर्फ इम्रान चिकना याला जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली. तसेच उमेश डोडेजा यांचे ७५ लाख रुपये चोरणारा चोरटा त्यांचा ड्रायव्हरच निघाला. चालक दीपक यशवंत सिंह याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासकामात चमकदार कामगिरी बजावल्याने पोलीस शिपाई चंद्रनीलकांत सोनुने यांचा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी प्रशस्तिपत्र देऊन यथोचित सन्मान केला आहे. तर विश्वास नांगरे-पाटील यांनीही या तपासाची दखल घेत कौतुक केले आहे.