बुलढाणा : डीजेच्या वापरावर बंदी असली, तरी काही मालवाहु वाहनांचे मालक हे त्यामध्ये बदल करून डीजे बसवत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्यांना या अतिवापरामुळे त्रास सहन करावा लागतो. मालवाहू किंवा इतर वाहनांमध्ये बदल करून डीजे बसवणारी वाहने आता आरटीओंच्या रडारवर आली आहेत. पिंपळगाव पाेलिस स्टेशनच्या हद्दीत जालनात जिल्ह्यातील मालवाहू वाहनावर डिजे बसवल्याने आरटीओंनी ५२ हजारांचा दंड केला आहे.
विविध मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर करण्यात येताे. डीजेमुळे ध्वनिप्रदूषणात तर वाढ हाेतेच. शिवाय रुग्ण व इतरांना नाहकचा त्रास सहन करावा लागताे. काही मालवाहू वाहनांचे मालक हे वाहनांमध्ये बदल करून डीजे बसवत असल्याचे समाेर आले आहे. जालना जिल्ह्यातील एका मालवाहू वाहनात बदल करून डीजे बसवण्यात आल्याचे आरटीओंच्या पथकाला निदर्शनास आले हाेते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी वाहन क्रमांक एमएच २१-५३४८ जप्त केले. तसेच या वाहनाच्या चालक माेहन भुसे यास ५२ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे़ त्यामुळे, आगामी काळात मालवाहु किंवा इतर वाहनात बदल करून डीजे करणे महागात पडणार असल्याचे चित्र आहे. आरटीओंनी अशा वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
वाहनाच्या मूळ स्थितीमध्ये बदल करून डीजे सदृश्य वाहन बनवल्यास मोटर वाहन कायद्यानुसार त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे. आगामी काळात अशा वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे.प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा