आषाढी एकादशीनिमित्त गावातील मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला पंचामृताने अभिषेक करण्यात येऊन नवीन कपडे अलंकार परिधान करण्यात आले़ कोरोना संसर्ग आजाराचे नियम पाळून भाविकांची मांदियाळी जमली हाेती़ यावेळी गावातील भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले़ आषाढी एकादशीनिमित्त सायंकाळी विठ्ठलाच्या प्रतिमेची गावातून टाळ, वीणा, पखवाज व पताका घेऊन शोभायात्रा काढण्यात आली़ यावेळी रस्त्यावर महिलांनी रांगोळी काढून श्रींच्या प्रतिमेची मनोभावे पूजाअर्चा केली़ काही नागरिकांनी दिंडी सोहळ्यातील भाविकांना चहा वितरित केला़ दिंडी सोहळ्यात अभंग, गवळण, भावगीतांसह विठ्ठल नामाचा जयघोष करण्यात आला़ दिंडी सोहळ्यात भजनी मंडळाचे बबन दमधडे, विठ्ठल वाघमारे, समाधान माळवदे , मदन जामदार, पिराजी मुंडे सुरेश राऊत , पप्पू धारकर, भिकाजी रांधवण, लक्ष्मण वाघमारे, विशाल खोलगडे , दीपक सानप, समाधान तरवडे, गजानन जावळे, रमेश कुलकर्णी, श्याम कराडकर , काशिनाथ राऊत यांच्यासह भाविक सहभागी झाले हाेते़ दिंडी सोहळा मंदिरात आल्यानंतर हरिपाठ, आरती करण्यात आली़ रात्रीला भजन होऊन द्वादशीला राजू जावळे व मदन जामदार यांच्या वतीने भाविकांना स्नेहभोजन देण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
किनगाव जट्टूत विठ्ठल नामाचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:22 AM