मेहकर : आपले सरकार महा-ई-सेवा केंद्र, आधार केंद्र परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी केंद्राचे कामकाज होत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हास्तरावर प्राप्त झाल्याने अशा केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. याबाबबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बोगस महा ई- सेवा केंद्र चालकांना चाप बसणार आहे.राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहोचविण्यासाठी आपले सरकार महा ई सेवा केंद्र, आधार केंद्र तसेच शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर सुरु केलेली केंद्रे आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र यांचे स्थापन तसेच नियंत्रण करण्याची जबाबदारी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आपले सरकार महा ई सेवा केंद्र, आधार केंद्राचे धारक शासनाचे मार्गदर्शक सुचनेनुसार कामकाज करीत नसल्याच्या तक्रारी वढल्या आहेत. तसेच संबंधीत महा ई सेवा केंद्र धारकास ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी संबंधीत महा ई सेवा केंद्र चालक काम करीत नसुन ते दुसºया ठिकाणी विनापरवानगी स्थानांतरीत होवुन महा ई सेवा केंद्राचे कामकाज करित असल्याच्या तक्रारी नागरिकांकडुन होत आहेत. त्यामुळे आपले सरकार महा ई सेवा केंद्र, आधार केंद्र धारक यांना ज्या ठिकाणी केंद्र मंजूर करण्यात आले आहे, त्याच ठिकाणी कामकाज करणे बंधनकारक आहे. त्यानुसार चौकशी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार, सेतु लिपीक तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी यांची यादवारे नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
प्रकरणाबाबत मेहकर तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र संचालकांची आढावा सभा घेण्यात आली आहे. या सभेमध्ये उपरोक्त विषयान्वये केंद्र संचालकांना सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.- डॉ. संजय गरकल,तहसिलदार, मेहकर