मेहकर : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घड़लेल्या घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करून त्यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मानव सुरक्षा संघ मेहकरच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात एक निवेदन मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांना दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात आग लागून दहा कोवळ्या मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे ही घटना घडली असून या घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करून त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. अन्यथा मानव सुरक्षा सेवा संघाचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे. यावेळी मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव गजानन इंगळे, राष्ट्रीय सचिव गजेंद्र भिसे, विदर्भ उपप्रमुख अविनाश प्रधान, विदर्भ सहसचिव संतोष झोपाटे,जिल्हा मीडिया प्रभारी मुन्ना काळे,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आरती दिक्षीत,तालुकाध्यक्ष प्रवीण पऱ्हाड,महिला आघाडी तालुकाध्यक्ष राजश्री पाटील,तालुका कार्याध्यक्ष विशाल डोंगरे,तालुका उपाध्यक्ष शिवा डुकरे पाटील,महिला आघाडी सचिव मानसी दिक्षीत,तालुका मीडिया प्रमुख सुनील मोरे, मीडिया प्रभारी फिरोज शाह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.