- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्राहकांची लूट करणाऱ्यांवर वैधमापन शास्त्र यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. मापात पाप किंवा इतर प्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाºयांनी जिल्ह्यात शतक गाठले आहे; अशा प्रकरणामध्ये गेल्या नऊ महिन्यात वैधमापन शास्त्र यंत्रणेने सोडसात लाख रुपयांवर दंड वसूल केला आहे.२४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांच्या संरक्षण व हक्काविषयी ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला माहिती घेतली असता जिल्ह्यात वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून होणाºया कारवाईचा धांदोळा समोर आला. जिल्ह्यात वैध मापन शास्त्र विभागाकडून ग्राहक जागृती अभियान राबविण्यात येते. ग्राहकाने खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी, आजच्या धावपळीच्या जीवनात आपली कशी फसवणूक होते, यावरही ग्राहकांना वारंवार जागरूक केल्या जाते. परंतू तरीसुद्धा जिल्ह्यातील ग्राहक जागरूक झालेले दिसून येत नाही. अशिक्षीतच नव्हे, तर सुशिक्षीत युवकही विक्रेत्यांकडून होणाºया फसवणुकीला बळी पडत आहेत. परंतू ग्राहक जागरूक नसल्याने गेल्या वर्षभरात एकही तक्रार विभागाकडे करण्यात आलेली नाही. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून वारंवार तपासणी मोहिम राबविण्यात येते. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाच निरिक्षकही कार्यरत आहेत. एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वजनमापे व पॅकींगच्या वस्तूमध्ये गोलमाल करून ग्रहाकांची फसवणूक करणाºयांना सात लाख ५१ हजार ६०० रुपये दंड करून तो वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात १०९ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यातील काही कारवाई प्रत्यक्ष दुकानदारांवर करण्यात आलेली आहे. तर काही प्रकरणांमध्ये उत्पादक कंपनीलाच दंड ठोठावण्यात आलेला आहे.एक कोटी पडताळणी व मुद्रांक शुल्कवैधमापन शास्त्र अधिनिमानुसार तराजू, वजनमाप, इलेक्ट्रानिक वजनयंत्रे, तोलन/मापन उपकरणे, मापे, मीटर यांचे वार्षिक फेरपडताळणी व मुद्रांकन वर्षातून एकदा करणे कायदा व नियमानुसार बंधनकारक आहे. मुदतीमध्ये वजनमाप, वजनयंत्रे फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्यास कायदेशीर कारवाई केल्या जाते. एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वैधमापन शास्त्र यंत्रणेने जिल्ह्यातून एक कोटी पाच लाख रुपये पडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल केला आहे.
वैध मापन शास्त्र यंत्रणेला १५ लाखाचे ‘टार्गेट’ वजन मापे, पॅकींगमध्ये ग्राहकांची फसवणूक करणारे, मापांची पडताळणी न करणारे व ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करून त्यांना दंड ठोठावण्याचे निर्देश मुख्य नियंत्रण कक्ष मुंबईकडून जिल्हास्तरावरील वैधमापन शास्त्र यंत्रणेला दिलेले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र यंत्रणेला २०१९-२० या अर्थिक वर्षासाठी १५ लाख रुपये टार्गेट आहे. त्यातील ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
पथकाच्या तपासणीमध्ये पॅकिंग व वजनमापात गैरप्रकार आढळून आलेल्यांवर ताताडीने कारवाई करण्यात आलेली आहे. एप्रिल पासून १०९ प्रकरणांमध्ये दंड करण्यात आलेला आहे. ग्राहकांनी जागरूक होऊन कुठे असा गैरप्रकार आढळल्यास त्वरीत तक्रार द्यावी.- नी. रा. कांबळे,सहाय्यक नियंत्रक,वैधमापन शास्त्र, बुलडाणा.