चिखली (बुलडाणा) : महिला आणि बालविकास मंत्रालय नवजात शिशू जन्म पंजीकरण केंद्रासाठी स्थानिक वृत्तपत्रात पाहिजेत या सदराखाली जाहिरात देऊन सुशिक्षित बेरोजगार युवकास नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही फसवणूक करणार्यांवर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नसल्याचा प्रकार घडला आहे. डिसेंबर २0१३ मध्ये एका वृत्तपत्रात महिला आणि बालविकास मंत्रालय नवजात शिशू जन्म पंजीकरण केंद्र याकरिता मुले व मुली पाहिजेत या आशयाची जाहिरात आल्याने तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील अनंथा सखाराम ठेंग या तरुणाने संपर्क साधून संपूर्ण बायोडाटा व आवश्यक कागदपत्रे पाठविली होती. त्यानुसार त्याची ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नियुक्तीपत्र देऊन महाराष्ट्र सुकन्या बालविकास योजना २८८, बाल भवन इमारत, मापुसा रोड, टुन बोस्को शाळेजवळ, पणजी, गोवा यांनी अनंथा ठेंग यास प्रथम प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार असल्याचे सांगून त्यासाठी ट्रेनिंग सेक्युरिटी म्हणून रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ठेंग याने ६ जानेवारी २0१४ रोजी १३ हजार २00 व ७ जानेवारी रोजी १५ हजार रुपये अमडापूर स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन २0१७३२१६१५ या खात्यात जमा केले. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण होऊन तसेच नियुक्तीपत्र मिळूनही बराच कालावधी उलटल्यानंतर अनंथा ठेंग याने संबंधितांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता प्रारंभी ट्रेनिंग प्रक्रिया प्रोसेसमध्ये असल्याचे सांगण्यात आले व काही दिवसांनंतर सदरचा दूरध्वनी क्रमांकही बंद करण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ठेंग याने अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दिली. यावरून अमडापूर पोलिसांनी १६ एप्रिल २0१४ रोजी भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला आहे; मात्र या सर्व प्रकाराला वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंंत आपल्याला न्याय मिळाला नसल्याने याप्रकरणी तातडीने कारवाई व्हावी व माझ्याकडून फसवणूक करून घेतलेली रक्कम परत देण्यात मिळावी, अशी मागणी अनंथा ठेंग याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
By admin | Published: December 24, 2014 12:14 AM