चिखली(जि. बुलडाणा), दि. १९ : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅँकेचे व्यवस्थापक पुन्हा एकदा आपल्या आडमुठेपणामुळे चर्चेत आले असून, यावेळी केलेल्या प्रतापामुळे तहसीलमार्फत आलेल्या निराधारांच्या मदतीचे धनादेश वेळेवर वटविल्या गेले नाहीत. परिणामी, त्याचा फटका लाभार्थ्यांना बसला असून, संजय गांधी निराधार योजनेतील वृद्ध महिला, पुरुष यांना नाहक बँकेचा उंबरठा झिझवावा लागत आहे.विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे नाव फेब्रुवारी २0१३ मध्ये बदलून विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक, असे झाले आहे. या बँकेकडे असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भाने तहसील विभाग गेल्या अनेक वर्षांपासून व्यवहार करत असून, बँकेचे नाव बदलले असतानाही यापूर्वी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक या नावानेच तहसील विभाग व्यवहार करत आहे. त्यानुसार तहसीलच्या संजय गांधी निराधार विभागाच्या शिपाई महिला ५५५ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी २ लाख ६२ हजार २00 रुपयांचे एकूण तीन धनादेश घेऊन गेल्या होत्या; मात्र ऐनवेळी बँकेचे व्यवस्थापक बोराडकर यांनी बँकेत चेक घेऊन आलेल्या महिलेला चेक परत करून तुमच्या यादीतील नावे व बँकेचे नाव चुकीचे आहे. आम्हाला कॉम्प्युटरमधील नावाचा डाटा पेनड्राईव्हमध्ये भरून द्या, चूक झाली तर तहसील जबाबदार राहील, असे सुनावले. बँक व्यवस्थापकाच्या या निर्णयामुळे योजनेतील वृद्ध महिला, पुरुष यांची कुचंबना झाली असून, अनुदानासाठी बँकेचा उंबरठा झिझविणार्या इसरूळ, मंगरूळ, अमोना, शेळगाव आटोळ, कोनड, पिंपळवाडी, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, तेल्हारा, एकलारा येथील लाभार्थ्यांना ऐन सणासुदीच्या काळात वेळेवर पैसे न मिळाल्याने उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत तालुक्यातील इसरूळ, मंगरूळ, अमोना, शेळगाव आटोळ, कोनड, पिंपळवाडी, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, तेल्हारा, एकलारा या गावातील निराधार योजनेचे सुमारे ५५५ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात येते. त्यानुषंगाने तहसीलमार्फत चेक क्रमांक ४२६६५३ द्वारे २७८ लाभार्थ्यांचे १ लाख ४३ हजार २00, चेक क्र.४२६८५५ द्वारे १५९ लाभार्थ्यांचे ९५ हजार ४00 आणि चेक क्र.५४७४६६ द्वारे ११८ लाभार्थ्यांंचे २३ हजार ६00 रुपये असे एकूण २ लाख ६३ हजार २00 रुपयांचे तीन चेक बँकेच्या व्यवस्थापकाने परत केल्याने निराधारांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम घेण्यासाठी चिखली येथे ये-जा करण्यासाठी एका वेळेला ५0 ते ७0 रुपयांचा खर्च होतो, हे विशेष.
निराधारांच्या मदतीचे धनादेश केले परत!
By admin | Published: September 20, 2016 12:21 AM