अंढेरा : पाडळी शिंदे येथील शेतकऱ्याच्या नावाचा धनादेश दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार देऊळगाव मही येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत उघडकीस आला. गत तीन वर्षांपासून या शेतकऱ्याची हक्काच्या पैशासाठी फरफट सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्याची रक्कम परत करण्याची मागणी हेात आहे.
पाडळी शिंदे येथील शेतकरी सुभाष पांडुरंग मिसाळ यांना १७ जुलै राेजी २०१८ राेजी एका कंपनीकडून २० हजार ६२७ रुपयांचा धनादेश मिळाला होता. हा धनादेश त्यांनी सेन्ट्रल बँकेच्या देऊळगाव मही शाखेत जमा केला होता. परंतु बँकेने धनादेशाची रक्कम सुभाष मिसाळ यांच्या खात्यात जमा न करता ती दुसऱ्याच्या खात्यात जमा केली. धनादेशाचे पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी मिसाळ गेले असता ही रक्कम बँकेने दुसऱ्याच्या खात्यात जमा केली असल्याचे तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यांनी लगेच धनादेशाची रक्कम ज्या खात्यात जमा केली त्या खातेधारकाला पत्रव्यवहार करून या रकमेबाबत खातरजमा करून पैसे परत करण्याचे पत्र बजावले हाेते. यात आठ दिवसात रक्कम परत करण्याचे आदेशित केले होते, तसेच रक्कम परत न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. परंतु त्यास तीन वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा सेन्ट्रल बँकेने त्या खातेधारकाकडून पैसे वसुल केले नाही, तसेच कारवाईही केली नाही. दुसरीकडे आपले पैसे आज मिळतील, उद्या मिळतील या आशेवर तीन वर्षांपासून मिसाळ बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. येत्या आठ दिवसात रक्कम परत न दिल्यास आंदाेलन करण्याचा इशारा मिसाळ यांनी दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी सेन्ट्रल बँक व्यवस्थापक यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ताे हाेऊ शकला नाही.
शेतकऱ्याचा धनादेश दुसऱ्याच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार गंभीर आहे़ या प्रकरणाची तत्काळ चाैकशी करून शेतकऱ्यास न्याय देण्यात येइल़
नरेश हेडाऊ, व्यवस्थापक, अग्रणी बॅंक, बुलडाणा
जिल्हा उपनिबंधकांना चाैकशीचे आदेश
देऊळगाव मही शाखेत शेतकऱ्याचा धनादेश दुसऱ्याच्या खात्यात जमा केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे़ या प्रकरणची चाैकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांना देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी सांगितले़