अनिल गवई।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राजर्षी छत्रपती शाहू महाराज अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११ व्या अधिवेशनासाठी खामगाव येथे उपस्थित होते. २७ डिसेंबर १९१७ साली भरलेल्या या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या या ऐतिहासिक भेटीची इतिहासात नोंद आहे. ६ मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळत आहे. स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात खामगाव येथील स्वातंत्र्यवीरांचा सहभाग राहीला आहे. देशाच्या स्वातंत्र्य इतिहासात खामगावचेही योगदान राहीले आहे. टिळक राष्ट्रीय विद्यालयामुळे ऐतिहासिक महापुरूषांच्या खामगाव येथे वारंवार भेटी होत असत. त्याचवेळी स्वातंत्र्यपूर्व काळात राजर्षी शाहू महाराजांनी खामगावातील शिक्षण परिषदेला उपस्थिती लावली होती. ‘शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे!’ असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला होता. त्यांच्या खामगाव येथील ऐतिहासिक भेटीची ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथा’त नोंद पुस्तकाचे संपादक डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतली आहे.
फरशीवरील देशमुखांच्या वाड्यात सत्कार!
खामगाव येथील रावबहादूर केशवराव जानराव देशमुख यांनी डिसेंबर १९१७ साली अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११ व्या अधिवेशनाचे आयोजन खामगाव येथे केले होते. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज होते. त्यावेळी रावबहादूर केशवराव देशमुख यांच्या वाड्यात शाहू महाराजांचा सत्कार झाला होता. शिवाजीराव देशमुख आणि नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी या वाड्यात १०३ वर्षांनंतरही राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती जतन करून ठेवल्या आहेत.
खामगाव येथे आयोजित शिक्षण परिषदेला राजर्षी शाहू महाराजांची उपस्थिती लाभली होती. त्यावेळी देशमुखांच्या पुरातन वाड्याला त्यांनी भेट दिली होती. शाहू महाराजांच्या स्मृती या वाड्यात जतन केल्यात. याची दखल छत्रपती संभाजी महाराजांनी २३ नोव्हेंबर २०१३ रोजी घेतली आहे. -देवेंद्र देशमुख, वंशज, रावब. केशवराव देशमुख.