लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा बुलडाण्यात उभारण्यात येणार असून या पुतळ्याच्या जागेचे भुमीपूजन २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या पुतळा उभारणीस जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याची माहिती शिव छत्रपती बहुउद्देशीय स्मारक समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेच समितीचे अध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील यांनी दिली.या पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष आ. संजय गायकवाड, उपाध्यक्ष राजेश हेलगे, प्रा. सुभाष मानकर, ॲड. जयश्री शेळके, , डॉ. राजेश्वर उबरंहडे, मंगेश बिडवे, नितीन राऊत यांच्यासह अन्य उपस्थित होते.या अश्वारूढ पुतळ्याच्या पायाभरणी प्रसंगी हाेणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण मंत्री यशाेमती ठाकूर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जि.प.अध्यक्षा मनिषा पवार यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंचधातूचा हा आकर्षक असा अश्वारूढ पुतळा राहणार असून यासाठी जवळपास दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आल्याचेही अंभोरे यांनी सांगितले.दुसरीकडे संगमचौकात बसस्थानकामधील व्यापारी गाळ्यांसमोरील खुल्या जागेत हा पुतळा उभारण्यात येणार असून त्याच्या लगत असलेल्या वीज वाहिन्या या भूमिगत करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असून, त्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, या अश्वारूढ पुतळ्यासोबतच आठ घोडे व त्यावर मावळे, दोन हत्ती आणि पुरातन किल्ल्याचा आकर्षक असा देखावाही येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती आ.संजय गायकवाड यांनी सांगितले. सोबतच पुतळा परिसराची स्वच्छता आणि देखभालीसाठी येथे दोन सेवाधारीही ठेवण्यास प्राधान्य राहणार असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी राजे सोमवारी बुलडाण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:59 AM