बुलढाणा : आपल्यासारख्यांना घरगडी संबोधून स्वत:ला घरंदाज समजणाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विरोधकांशी हातमिळवणी करीत संपवले. शिवसैनिकांचे खच्चीकरण करीत ज्या काँग्रेसला गाडायची भाषा शिवसेनाप्रमुखांनी केली त्यांच्याच मांडीला मांडी लावत यांनी सत्ता स्थापन केल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिखली येथे केली.
चिखली येथील क्रीडा संकुलाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना १३ जानेवारी रोजी ते बोलत होते. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. संजय शिरसाट, चंद्रकांत पाटील, डॉ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, जिल्हा शिवसेनाप्रमुख अेामसिंग राजपूत, ऋषी जाधव, शांताराम दाणे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, काल काहींनी मुक्ताफळे उधळली. स्वत:ला घरंदाज समजत आपल्याला तुच्छ लेखले; पण त्यांना आजही कळत नाही की, त्यांच्यासोबत असलेले आज आपल्यासोबत आले आहेत. सत्ता असताना आपण पायउतार झालो. तरीही ५० जणांनी आपल्याला पाठिंबा दिला. इतके असतानाही त्यांना अद्याप समजत नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर खरपूस टीका केली. स्वत: घरंदाज म्हणून घेणाऱ्यांनी निवडूक एकासोबत लढवली आणि सत्ता दुसऱ्यासोबत स्थापन करीत आपली अख्खी हयात काँग्रेसविरोधात घालवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार संपवला. घरी बसून सरकार चालविता येत नाही, असा उल्लेख पुस्तकात शरद पवारांनी केला आहे. तरीही तुम्ही त्यांच्यासोबत बसता. आगामी काळात जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले. बाळासाहेबांनी पाहिलेले कलम ३७० हटविण्याचे आणि राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्णत्वास नेले. दहा वर्षांत त्यांनी देशाचा चेहरामोहरा बदलला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
चिरंजीवांसाठी दोन आमदारांचे बळी!
आपल्या चिरंजीवांसाठी दोन-दोन आमदारांचे बळी यांनी घेतले. आपण तसे नाही आणि तसे करणारही नाही. हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटो काढण्यापेक्षा शेती केलेली बरी, असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी बोलताना मारला. शेती करण्याच्या मुद्द्यावरून मध्यंतरी झालेल्या टीकेलाही याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले.