यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जि. प. अध्यक्ष मनीषा पवार, खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. त्यामुळे लोणार सरोवराचा विकास करताना नेमका कोणत्या पद्धतीने करावा, याचा विचार एकत्रितरीत्या करण्यात यावा. सरोवर परिसरात मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
लोणार सरोवर हे ज्याप्रमाणे वन पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे वैज्ञानिकही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी या ठिकाणी सरोवराच्या वरच्या बाजूला एक पायरस्ता ठरवावा. या रस्त्यावर पर्यटकांना थांबण्यासाठी स्थळे विकसित करावी. सरोवराच्या चारही बाजूला अशी व्यवस्था झाल्यास पर्यटकांनाही सोयीचे होईल, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, धारतीर्थ परिसर व दैत्यसूदन मंदिराचीही पाहणी केली.
धारतीर्थ विकासाबाबत सूचना
धारतीर्थ परिसराची पाहणी करताना मुख्यमंत्र्यांनी परिसर विकासाबाबत सूचनाही दिल्या. येथील जमिनीचे सपाटीकरण करून लॅण्डस्केप विकसित करावे ते मानवनिर्मित वाटू नये याची काळजी घेत नैसर्गिक टच दिला जावा. सौंदर्यीकरण करून शोभेची झाडे लावण्यात यावीत. परिसराच्या विकासासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे असे पाहणीही दरम्यान त्यांनी सांगितले. त्यानंतर दैत्यसूदन मंदिराला त्यांनी भेट दिली. दैत्यसूदन मंदिरात आत जात मुख्यमंत्र्यांनी येथील ऐतिहासिक शिल्पाविषयी माहिती घेतली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत छायाचित्रण केले. कोरीव कामांचे मोबाईलमध्ये छायाचित्र काढले. यावेळी लोणार सरोवराचे अभ्यासक स्व. सुधाकर बुगदाने यांच्या स्नुषा शैलेजा श्रीपाद बुगदाने व शुभदा स्वप्नील बुगदाने यांनी स्व. सुधाकर बुगदाने लिखित लोणार सरोवर हे पुस्तक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिले.