प्रामुख्याने या व्हीसीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणता निर्णय जाहीर करतात, याकडे प्रशासकीय वर्तुळासह जनसामान्यांचे लक्ष लागून राहले आहे. कधी लॉकडाऊन, कधी मिनी लॉकडाऊन तर कधी वीकेंड लॉकडाऊन अशा चक्रव्यूहात सध्या जिल्ह्यातील नागरिक अडकलेले आहेत. कोरोनाची वाढती व्याप्ती व जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गेल्या काही दिवसांपासून दररोज आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेत आहेत. दररोज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भाने बैठक होत असून, निर्धारित केलेल्या कामांमध्ये नेमकी किती प्रगती झाली याचा आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील यंत्रणाही सध्या अलर्ट झाली आहे. दरम्यान, १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सायंकाळी पाच वाजता व्हीसीद्वारे संवाद साधणार आहेत. या व्हीसीनंतर राज्यस्तरावर लॉकडाऊनसंदर्भात नेमका कोणता निर्णय घेतला जातो, याबाबत सध्या उत्सुकता लागून आहे. मात्र, १४ एप्रिल रोजी सायंकाळी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीमध्ये नेमकी कोणती चर्चा होते ,हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी लॉकडाऊनचा मुद्दा आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती व परिस्थितीत नेमकी काय सुधारणा होत आहे हे मुद्दे या व्हीसीतील चर्चेत केंद्रस्थानी राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनसंदर्भाने आज मुख्यमंत्री घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:31 AM