चिखली : चिखली महावितरण उपविभागाचे विभाजन करून तालुक्यातील उंद्री येथे नवीन उपविभागाची निर्मिती करावी, तसेच चिखली शहर भाग १ व शहर भाग २ आणि चिखली ग्रामीण भाग २ या वितरण केंद्राचे विभाजन करून पेठ येथे नवीन वितरण केंद्राची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री ना. नितीन राऊत यांनी दिले आहेत. माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मागणीची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत.
चिखली उपविभागात सद्यस्थितीत ११२ गावे जोडलेली असून, ग्राहक संख्या ७८ हजार ६४४ आहे, तर १२ उपकेंद्र असून, विस्तारित विद्युत वाहिन्या व रोहित्र मोठया संख्येने आहेत. त्याचप्रमाणे भौगोलिक स्थिती पाहता चिखली उपविभागाअंतर्गत कृषी प्रभावित व सिंचन क्षमता जास्त प्रमाणात आहे. खेडयांचा विस्तार सुमारे २० ते २५ किलोमीटर अंतराचा आहे. नवीन विभाजनामुळे खेड्यांची संख्या कमी होऊन वीज ग्राहकांना वेळेत सुविधा पुरविणे, नवीन वीज कनेक्शन त्वरित देणे, वीज गळती कमी करणे, वीज चोरीचे प्रमाण कमी होऊन कंपनीच्या महसुलात वाढ होणे शक्य असल्याने तालुक्यातील उंद्री येथे उपविभागाची निर्मिती तत्काळ करण्यात यावी, तसेच म्हसला बु. येथील विद्युत उपकेंद्र फेज २ मधून १ मध्ये वर्ग करून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी बाेंद्रे यांनी केली हाेती.
११२ गावांसाठी ११ उपकेंद्र
चिखली येथील उपविभागात सद्यस्थिीतीत एकूण ६ उपकेंद्र आहेत. गावांची संख्या ११२ व उपकेंद्रांची संख्या ११ आहे. आशा स्थितीत ग्राहकांना वीज वितरणची योग्य वेळी जास्त सेवा देणे शक्य होत नाही. त्यामुळे चिखली उपविभागात असलेले वीज वितरण केंद्राचे भौगोलिकदृष्टया तसेच ग्राहक संख्या पाहता मोठ्या वितरण केंद्राचे नवीन वितरण केंद्र निर्माण करणे आवश्यक असल्याचे बाेंद्रे यांनी निवेदनात म्हटले हाेते.
पेठ वितरण केंद्र स्थापन हाेणार
चिखली येथील चिखली शहर १ व चिखली शहर २ आणि चिखली ग्रामीण २ या वितरण केद्रांचे विभाजन करून तालुक्यातील पेठ या वितरण केंद्राची नव्याने निर्मिती करावी. तसेच शहरी व ग्रामीण नागरिकांच्या विजेच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशी मागणी राहुल बोंद्रे यांनी ना. राऊत यांची भेट घेऊन व निवेदनाव्दारे केली हाेती. दरम्यान या मागणीची तातडीने दखल घेत ना. राऊत यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहे. यावेळी बुलडाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसंडी, धाड सरपंच रिजवान सौदागर यांची उपस्थिती होती.