लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : जिल्ह्यात घोषित दहा दिवसांच्या निर्बंध दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी सोडून खासगी वाहनांना पेट्रोल, डिझेल न देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही शहरातील एका पेट्रोल चालकांकडून नियमांचा उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात येताच महसूल व नगरपालिका प्रशासनाने दहा हजारांचा दंड वसूल करून चांगलाच दणका दिला आहे. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत़ या काळात सुरूवातीला अत्यावश्यक सेवा आणि माध्यम प्रतिनिधींनाच पेट्रोल, डिझेल देण्याबाबत आदेशित केले होते. दरम्यान ११ मे रोजी सुधारित आदेशानुसार शेतकऱ्यांना शेतातील मशागतीची कामे करण्यासाठी व शेतमालाच्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि वकिलांना देखील इंधन देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. असे असताना येथील रेणुका पेट्रोल पंपावर खासगी वाहनांना सर्रासपणे पेट्रोल, डिझेल दिले जात होते. तथापि यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळली होती. याबाबत माहिती मिळताच नगरपालिका व महसूलच्या पथकाने पेट्रोल पंपावर धाव घेऊन पेट्रोल पंपधारकास याबाबत विचारणा केली असता त्यांनी पथकासोबत हुज्जत घातली. याठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती तहसीलदार अजितकुमार येळे यांना देण्यात आली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यावरून पंपावर प्रचंड गर्दी व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ मे रोजी नगरपालिकेने पेट्रोल पंप चालकांना १० हजार रूपयांची दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई नायब तहसीलदार वीर, तलाठी गिरी, भुसारी यांच्यासह नगरपालिकेचे फिरते पथक पथक प्रमुख आत्माराम इंगळे, राजेंद्र रावे, फकिरा शिंगणे, राजू देशमुख, सुभाष दांडगे यांनी केली.
चिखलीत पेट्रोल पंपचालकास दहा हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:10 AM