चिखली : अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी रामभक्त आपापल्या परीने दान देत आहेत. यामध्ये विदर्भातील पहिली नागरी बँक दी चिखली अर्बन परिवारानेही मोठा वाटा उचलला असून बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांच्या पुढाकाराने मंदिराच्या निर्माणासाठी तब्बल २३ लाख ८८ हजार रुपये दान दिले आहेत.
अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी संपूर्ण देशभरातून निधी संकलनाचे कार्य सुरू आहे. देशाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक स्वयम संस्थेचे सदस्य या यज्ञामध्ये आपली आहुती टाकताना दिसत आहेत. सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाणाऱ्या या राष्ट्रकार्याचे आपण साक्षी तर आहोतच; पण आपलादेखील खारीचा वाटा असावा या उदात्त हेतूने चिखली अर्बन परिवाराने बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या संकल्पनेला हात देत बँकेचे संचालक, सल्लागार, कर्मचारी व हितचिंतक यांनी एकत्र येऊन तब्बल २३ लाख ८८ हजारांच्या निधीचे संकलन केले आहे. हा निधी बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्ता यांनी जिल्हा व नगर निधी संकलन नियोजन समितीकडे जिल्हा संघचालक तथा जिल्हा निधी संकलन समितीचे अध्यक्ष शांतीलाल बोराळकर, निधी संकलन अभियानाचे जिल्हा संयोजक गजानन ठाकरे, नगर निधी संकलन अभियानाचे संयोजक अतुल श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत देण्यात आला. यावेळी रा.स्व. संघाचे माजी क्षेत्र प्रचारक तथा भाजप महाराष्ट्राचे माजी प्रदेश संघटनमंत्री प्रा. रवींद्र भुसारी यांची प्रमुख उपस्थिती होती.