लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यात प्रथम झालेल्या सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत चिखली तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून, निवडणूक झालेल्या तालुक्यातील २८ पैकी १७ ग्रामपंचयतींमध्ये काँग्रेस प्रणित सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणण्यात काँग्रेसला यश आले असून, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गावोगावच्या नागरिकांचे जथ्थे व विजयी उमदेवारांनी आमदार राहुल बोंद्रे यांची जनसेवा कार्यालयावर भेट घेऊन जल्लोष साजरा केला. तालुक्यातील पाटोदा, कर तवाडी, आंधई, उंद्री, चंदनपूर, पेनसावंगी, कव्हळा, मिसाळवाडी, रानअंत्री, बेराळा, गुंजाळा, सातगांव भुसारी, किन्ही सवडत, वरखेड, भानखेड, मनुबाई व महिमळ या १६ गावाचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार हे काँग्रेस प्रणित असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून, वरील गावातील सर्व विजयी सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांसह जनसेवा कार्यालयावर येऊन आनंद साजरा केला. दरम्यान, गत काळात केंद्रात व राज्यात असलेल्या भाजप सरकारकडून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरीत त्यांच्यावर लादलेली महागाई व भाववाढ, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासत, सुरू असलेला मनमानी कारभार, नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी, यासारखे ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करणारे निर्णय, यामुळे ग्रामीण भागात भाजपाविषयी नाराजीचे वातावरण होते. त्याचाही परिणाम या निवडणुकीत जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून येण्यात झाल्याचे या निवडणुकीत दिसून आल्याची प्र ितक्रिया काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष कैलास खंदारे व शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी यांनी दिली आहे.
कव्हळा ग्रामपंचायतवर काँग्रेसचे वर्चस्वतालुक्यातील उंद्री आणि कव्हळा या ग्रामपंचायतीमध्ये दीर्घकाळ भाजपचाच वरचष्मा राहिला आहे; परंतु काँग्रेसकडून उंद्रीमध्ये भूमीमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांना पक्षात सामावून घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी उमेदवारी दिली. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला व पहिल्यांदाच थेट निवडणुकीतून तालुक्यातील मोठय़ा ग्रामपंचायतींपैकी एक असलेली उंद्री ग्रामपंचायत काँग्रेस ताब्यात आली आहे. त्याचबरोबर कव्हळा येथेही अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत ही ग्रामपंचायत काँग्रेसने हस्तगत केली असून, ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीतही काँग्रेसनेच व्यापक यश संपादन केले असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.