चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 01:48 PM2019-03-04T13:48:56+5:302019-03-04T13:49:11+5:30

पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते.

Chikhli MLA, Rahul Bondre arrested along with the activists | चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेंना कार्यकर्त्यांसह अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: चिखली पोलीस स्टेशनमध्ये गत २२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा आणि यातून पोलीस स्टेशनवर झालेली दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आमदार राहुल बोंद्रेंसह दोन्ही पक्षाच्या २२९ जणांवर शासकीय मालमत्ता नुकसानीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून अटकसत्र राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आ. राहुल बोंद्रेंना पोलिसांनी अटक केली.
तालुक्यातील धोत्रा भणगोजी जि. प. शाळेत २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे व भाजपच्या जि. प. महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याचे पडसाद शहरात उमटले आणि भाजप व काँग्रेसच्या दोन्ही गटात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला होता. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. हा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. दरम्यान, याप्रकरणी पीएसआय मोहन पाटील यांच्या फिर्यादीवरून आ. राहुल बोंद्रे यांच्यासह दोन्ही गटाच्या २२९ जणांवर भादंविच्या कलम १४३, १४५, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ४२७, २९४, कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १३५ मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात सचिन बोंद्रे व राहुल सवडतकर यांना अटक केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांना हव्या असलेल्या आ. राहुल बोंद्रेंसह दोन्ही गटातील इतर कार्यकर्त्यांसाठी पोलिसांनी अटकसत्र राबविणे चालविले होते. दरम्यान, प्रकरणात आरोपी असणारे आ. राहुल बोंद्रे यांनी ३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली होती; मात्र त्यापूर्वीच चिखली पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांनी दुपारी ४ वाजता स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरातून आ. बोंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आ. बोंद्रे यांना आपल्या गाडीत बसवले व इतर कार्यकर्त्यांना दुसऱ्या वाहनाने चिखली पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान, आ. बोंद्रे यांना बुलडाणा येथे पुढील तपासासाठी नेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी दिली. या पृष्ठभूमीवर चिखली पोलिसांनी शहात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता, तर अपर पोलीस अधीक्षक डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक महामुनी, स्थानिक गुन्हे शाखा अधीक्षक महेंद्र देशमुख यांच्यासह चिखली पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 
२२९ कार्यकर्त्यांवर गुन्हे

या प्रकरणात चिखली पोलिसांनी काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या २२९ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये आ. राहुल बोंद्रे यांच्यासह डॉ. सत्येंद्र भुसारी, प्रदीप पचेरवाल, डॉ. मोहम्मद इसरार, रफीक कुरेशी, नंदू सवडतकर, पप्पू देशमुख, किशोर कुहिटे, मो. आसीफ मो. शरीफ, रमेश सुरडकर, विठ्ठल साळोख, लक्ष्मण अंभोरे, योगेश देशमुख, किशोर साळवे, प्रदीप साळवे, खलील बागवान, सचिन शिंगणे, गजानन परिहार, राम जाधव, दीपक खरात, योगेश जाधव यांना अटकदेखील केली असून, रात्री उशिरापर्यंत अटकसत्र सुरूच असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Chikhli MLA, Rahul Bondre arrested along with the activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.