लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: बोंडअळीमुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोन्सेंटो कंपनीविरुद्ध कारवाई करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन केले. यानंतर तालुका कृषी अधिकार्यांनी मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर मंगळवारी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांचे यावर्षी बोंडअळीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यापासून तर यवतमाळ, नागपूरपर्यंत बीटी कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने शेतकर्यांना कपाशी अक्षरश: उपटून टाकावी लागली. कपाशी लागवडीवर झालेला खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी त्नस्त झाला आहे. जागतिक कीर्तीच्या मोन्सॅन्टो कंपनीचे बीटी कपाशीचे वाण विकसित केले होते व बीटीचे हे वाण भारतात सर्वप्रथम मोंन्सेंटो कंपनीनेच आणले होते व भारतात विक्री करण्यासाठी मोन्सॅन्टो व महिको कंपनीचा करार झाला होता. विशेष म्हणजे एका एकरात १२ ते १५ क्विंटल उत्पादनाचा तसेच कोणत्याही प्रकारच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव बियाण्यावर होत नसल्याचा दावा कंपनीने केला होता. प्रत्यक्षात बीटी कपाशीची लागवड करणार्या चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथील बाबुराव नामदेव गरूड या शेतकर्याने दोन एकरात पारस ब्रह्म या बीटीची लागवड केली होती; मात्न त्याला एका एकरात केवळ ७५ किलोच कापूस झाला. त्यामुळे या शेतकर्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. त्या तक्र ारीची गंभीर दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे यांनी १९ डिसेंबर रोजी चिखली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला होता. हे आंदोलन रात्नी उशिरा सुरूच होते. दरम्यान, ‘स्वाभिमानी’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कृषी विभागाच्यावतीने तालुका कृषी अधिकारी ए.टी. सुरडकर यांनी शेतकर्यासह चिखली शहर पोलीस स्टेशनला मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केल्याने या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी भादंवि कलम ४२0, ४२७ कॉटन सीड अँक्ट २00९ च्या कलम १३ (१) नुसार कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, स्वाभिमानीच्या आक्रमक आंदोलनामुळे जागतिक दर्जाच्या मोन्सॅन्टो कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने इतर बियाणे कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही बहुधा भारतातील पहिलीच घटना असावी. या आंदोलनात मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन पाटील बंगाळे यांच्यासमवेत बुलडाणा जिल्हाध्यक्ष भगवान मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नितीन राजपूत, राम अंभोरे, अनिल वाकोडे, शे. मुक्तार, संतोष परिहार, प्रशांत जयवाळ, बाबुराव गरूड, रामेश्वर परिहार, प्रमोद इंगळे, नवलसिंग मोरे, सुभाष घाडगे, रमेश शिरसाट, सदानंद पाटील, अशोक सोनाळकर, ज्ञानेश्वर काटकर, सुरेश जाधव, सुरशे गाडे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
नुकसान भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - रविकांत तुपकरबीटीचे मूळ तंत्नज्ञान हे मोंन्सेंटो कंपनीने विकसित केले आहे व भारतात हे तंत्नज्ञान मोन्सॅन्टो कंपनीनेच आणले आहे. त्यामुळे बोंडअळीने शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीला मोन्सॅन्टो कंपनीच जबाबदार आहे. हे तंत्नज्ञान विकसित करताना मोन्सॅन्टो कंपनीने बीटीवर कुठलेही अळीचे आक्र मण होणार नाही व प्रती एकर १५ ते २0 क्विंटल उत्पादन निघेल, अशी हमी दिली होती; परंतु प्रत्यक्षात बोंडअळीने आक्रमण केल्यावर आंतरराष्ट्रीय मोन्सेंटो कंपनीने शेतकर्यांवरच खापर फोडून हात वर केले; मात्न स्वाभिमानीने आक्रमक आंदोलने करीत हा प्रश्न लावून धरला आहे त्यामुळेच गुन्हे दाखल होत आहे; मात्र एवढय़ाने प्रश्न सुटणार नाही. मोन्सॅन्टो कंपनीला सरकार पाठीशी घालत आहे. या कंपनीने शेतकर्यांकडून घेतलेली रॉयल्टी व नुकसान भरपाई वसूल केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.